सीमावादावर मुख्यमंत्री समन्वयातून मार्ग काढतील – प्रविण दरेकर

0

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सीमावाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालून समन्वयातून मार्ग काढतील आणि मराठी भाषिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतील. विरोधक भरकटलेले आहेत. प्रश्न कोणते, कोणत्या प्रश्नावर लढले पाहिजे यापेक्षा कुठलेही प्रश्न घेऊन जनतेच्या मनात महायुतीच्या बाबत प्रतिमा मलिन करण्यासारखे काही करता येतेय का? असा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा सुरू आहे. त्यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारावा, जनतेच्या प्रश्नासाठी पुढे यावे. अन्यथा उरलेसुरलेले अस्तित्व जनता संपवल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले की, विरोधकांना सर्वप्रथम लाज वाटली पाहिजे. ज्या विरोधी पक्षात काँग्रेस आहे त्या काँग्रेसचे सरकार तिथे आहे आणि ते सरकार अत्याचार करतेय. आपले सरकार अत्याचार करतेय आणि पुन्हा नाकाने कांदे सोलून बोलायचे ही त्यांची प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार आहे म्हणूनच नाही तर या राज्यात कुठलेही सरकार असले तरी सीमावासियांच्या बाजूनेच महाराष्ट्राचे सरकार राहिलेले आहे. आमचीही भुमिका तेथील मराठी भाषिकांच्या बाजूने आहे. मुख्यमंत्री फडणवीस जातीने लक्ष घालून समन्वयातून योग्य मार्ग काढतील. मराठी भाषिकांना त्रास होणार नाही याची निश्चितच दक्षता घेतील.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech