नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात प्रचार सुरू; काँग्रेस म्हणजे कमिशन नाहीतर कामबंद

0

चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद मोदी यांनी चंद्रपूरमधून आज प्रचाराचे रणशिंग फुंकले. आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसच्या एकेका धोरणावर कडाडून टीका केली. काँग्रेस म्हणजे कमिशन, नाहीतर काम बंद, अशा शेलक्या शब्दात त्यांनी काँग्रेसची संभावना केली. काँग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्राची नेहमीच उपेक्षा झाली, असा दावा मोदी यांनी केला. गरीब, आदिवासी, वंचित आणि शेतकर्‍यांसाठी महत्त्वाच्या योजना महाराष्ट्रात यापूर्वी असलेल्या सरकारने बंद केल्या, असा आरोप मोदी यांनी केला.
आधीच्या सरकारने सत्तेवर असताना केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे एकमेव काम केले. शेतकर्‍यांची हिताची असलेली जलयुक्त शिवार योजना बंद केली.कोकणातील नाणार येथील रासायनिक प्रकल्प नाकारला, मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गाला विरोध केला. मुंबईतील मेट्रो प्रकल्पालाही त्यांचा विरोध होता. प्रकल्प राबवायचा असेल तर कमिशन द्या नाहीतर काम बंद पाडू, असे सरकारचे धोरण होते. पण आता ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले.

समृध्दी महामार्ग जवळपास पूर्ण होत आला. मुंबईतील किनारपट्टी मार्गाचे काम मार्गी लागले, असे मोदी म्हणाले. केंद्रातील आपल्या सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांचा पाढा मोदी यांनी वाचला. त्याचप्रमाणे स्थिर सरकारमुळे देशात आता आश्वासक वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या राज्यात गरीब, दलित, वंचित यांच्या वस्त्यांमध्ये पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नव्हते. वीज नव्हती, चांगले रस्ते नव्हते. या वंचित वर्गातील मुलांना चांगले शिक्षण मिळत नव्हते. आम्ही त्यांना जीवन बदलण्याची हमी दिली, असा दावा मोदींनी केला.

कारले कडू ते कडूच
मोदींनी काँग्रेसवर तुफानी हल्ला करताना, मराठी भाषेतील एक म्हण मराठीत बोलून दाखवली. ‘कडू कारले तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी कडू ते कडूच’ राहणार. काँग्रेस पक्ष सुद्धा असाच आहे. तो कदापि सुधारणार नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज त्यांची वाईट अवस्था आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech