आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्विकारला

0

मुंबई : केंद्र सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार त्यांनी आज, बुधवारी पदभार स्वीकारला. ते रिझर्व्ह बँकेचे २६वे गव्हर्नर असतील आणि भारताच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख म्हणून त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ असेल. देश महागाई नियंत्रण आणि आर्थिक वाढ मंदावणे यासारख्या आव्हानांचा सामना करत असताना मल्होत्रा ​​यांची नियुक्ती एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. मल्होत्रा ​​सध्या अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी वित्तीय सेवा विभागात सचिवपदही भूषवले होते. अर्थविषयक बाबींमध्ये मल्होत्रा ​​यांची गणना सुधारक आणि मजबूत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांना राजस्थानातील जवळपास सर्वच विभागात काम करण्याचा अनुभव आहे. केंद्रातील अर्थ मंत्रालयात काम केले आहे. मल्होत्रा ​​यांची गणना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२४ रोजी संपला. त्या जागी मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली.

संजय मल्होत्रा ​​हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि राजस्थानच्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहेत. राजस्थानमधून ते जानेवारी २०२० मध्ये प्रतिनियुक्तीवर केंद्रात आले. येथे त्यांची प्रथम ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती झाली. यानंतर ते थेट अर्थमंत्रालयात दाखल झाले. येथे ते महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत राहिले. सुधांश पंत यांच्या आधी संजय मल्होत्राचे नाव राजस्थानच्या मुख्य सचिवपदासाठी चर्चेत होते.संजय मल्होत्रा ​​यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी आणि यूएसएच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा ​​यांना वित्त, कर, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ३३ वर्षांचा अनुभव आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech