मराठीत पाट्या न लावल्यास दुप्पट कर भरा

0

मुंबई : मुंबईतील दुकानांवर मराठी भाषेमध्ये पाट्या न लावणा-यांना आता पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. येत्या १ मे पासून ज्या दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या नसतील त्या दुकाने आणि आस्थापनांना दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे.

प्रकाशित फलकासाठी दिलेला परवानादेखील तत्काळ रद्द केला जाणार आहे. पालिकेच्या मराठी पाट्यांविरोधातील संथ कारवाईवर बातमी दिली गेली होती. त्याची दखल घेत पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेत अधिका-यांना सूचना दिल्या.

वारंवार सवलत देऊनदेखील, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच अधिनियम यांचे पालन न करणा-या दुकाने व आस्थापनांवर आता सक्त कारवाई करावी लागेल, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या पार्श्वभूमीवर मराठी पाट्या न लावणा-या दुकानदारांना १ मेपासून दुप्पट मालमत्ता कर आकारण्यात यावा व त्यासाठी योग्य ती प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यास सांगितले. ग्लो साईन बोर्डसाठी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून परवाने दिले जातात, असे परवानेदेखील मराठी फलक नसलेल्या दुकाने व आस्थापनांच्या बाबतीत तत्काळ प्रभावाने रद्द करून त्यांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्याच्या सूचना दिल्या.

मराठी भाषेत, देवनागरी लिपीत असणारे फलक त्यांनी लावावेत, त्यासाठी नव्याने प्रकाशित फलकांची नोंदणी करावी, अशा सूचना पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेत अधिका-यांना दिल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech