मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना राजकीय विश्लेषण तसेच अचूक संदर्भासाठी अनेक विचारवंत, राजकीय नेते, प्रशासकीय माहिती तसेच अन्य वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष कै.विजय वैद्य यांच्या संकल्पनेतील संदर्भ ग्रंथालय साकारण्यासाठी त्यांच्या पश्चात संघाचे सदस्य अशोक शिंदे, नासिकेत पानसरे, प्रितम नाचणकर यांनी गेली अनेक महिने अथक परिश्रम करून ही ग्रंथसंपदा एकत्रित केली आहे.त्यातून कै. विजय वैद्य संदर्भ ग्रंथालय सुरु होत आहे. यामध्ये राजकीय,वैचारिक, साहित्यिक, चरित्र, भाषा संचालनालय, आरोग्य विज्ञान, पत्रकारिता, सहकार, कृषी, कामगार, महिला व बाल विकास, सांस्कृतिक अशी विभिन्न विषयावरील ग्रंथ,विश्वकोश तसेच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काकासाहेब गाडगीळ, व्यं. केतकर, आर. सी. मुजुमदार, न. चिं. केळकर लिखित टिळक चरित्र आदींचे खंड तसेच ग्रंथ उपलब्ध आहेत. सुमारे १२०० ग्रंथांचे विषयानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.तसेच त्यांची संगणकीय सूची करून उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच आधुनिक किंडल स्वरुपातील ग्रंथदेखील सदस्यांना उपलब्ध करण्याची योजना आहे. संघाचे माजी अध्यक्ष कै. विजय वैद्य यांची उद्या बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी जयंती असून, याचे औचित्य साधून संदर्भ ग्रंथालयाचे लोकार्पण संघाचे ज्येष्ठ सदस्य योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते आणि प्रमुख अतिथी निलेश वडनेरकर, ग्रंथपाल – माहिती व संशोधन अधिकारी, विधिमंडळ सचिवालय आणि विक्रांत वैद्य यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.