(अनंत नलावडे )
मुंबई – राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडून १७ दिवसांचा कालावधी उलटून गेला असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप ८ मंत्री व ३ राज्यमंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे.मात्र अलीकडेच माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल देशभरात सात दिवसांचा शासकीय दुखवटा केंद्र सरकारने जाहीर केल्याने अद्यापही बऱ्याच मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार घेतलेला नसल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले.
नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधीचा सोहळा पार पडला.मात्र अधिवेशनाची सांगता होताच मंत्र्यांचे खातेवाटप आणि निवासस्थान वाटप जाहीर करण्यात आले.काही मंत्र्यांच्या पदरात आवडी खाती पडली नसल्याने तर काहींना मोक्याची निवासस्थाने मिळाली नसल्याने आपली नाराजीही होती.त्यात मंत्र्यांची संख्या पाहता अनेकांच्या पदरी अद्याप दालने पडलेली नाहीत. तिसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांना काळात जे मंत्री होते, आणि ज्यांच्या दालनापासून ते फर्निचर अगदी सुस्थितीत होते व आताही बहुतेकांना तेच दालन मिळाले अशा मंत्र्यांनीही आपल्या दालनाची सर सकट नूतनीकरण व सुस्थितीत असलेले फर्निचर बदलण्याची नव्याने कामे काढल्याने विभागांचा पदभार घेतलेला नाही.त्यामुळे बहुतांश विभागांच्या कामकाजाचा आढावा बैठका सह्याद्री अतिथीगृहावर घेण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावल्याचे ठळकपणे दिसून येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ६ ब्या मजल्यावरील आपल्या दालनाच्या नूतनीकरणाचे सरसकट काम काढल्याने जरी आपल्या पदाचा शपथविधी झाल्यानंतर पदभार घेतला असला तरी त्यांनीही मंत्रालयात न येणेच पसंद केले आहे. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी दालन व पदाचा पदभार घेतला असला तर एक अजितदादा यांचा अपवाद वगळला तर एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयाकडे पाठ फिरवल्याचे ठळकपणे समोर आले.अशात जर आपला प्रमूख नेताच जर मंत्रालयात येत नसेल तर आपण तरी का जावे अशी भावना महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नवोदित मंत्र्यांची झाल्याचेही एक प्रमूख कारण यानिमित्ताने प्रकर्षाने समोर येत आहे.
आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगूनही ज्यांनी आपल्या विभागांचा पदभार अद्याप घेतलेला नाही अशात दुग्ध विकासमंत्री अतुल सावे,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,रोजगार हमीमंत्री भरत गोगावले , क्रीडा आणि अल्पसंख्यांक मंत्री दत्ता भरणे, जलसंपदा मंत्री अनुक्रमे राधाकृष्ण विखे पाटील, व गिरीश महाजन यांनीही अद्यापही पदभार स्वीकारला नाहीय तर सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ,अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जायस्वाल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.मात्र बुधवारी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पदभार स्वीकारत आपल्या कामकाजाला सुरूवातही केली. तरं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आपला विभागाचा आढावा बैठक तर घेतलीच पण त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेत नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत कामकाज व अन्य बाबींची सविस्तर माहितीही घेतली. तरं मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे गणले जाणारे महसूल खात्याचे मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अनेक जिल्ह्यात विभागवार बैठका घेत कामाला धडाक्यात सुरुवात केल्याचे दिसून आले.
……………………………