सोलापूर : सोलापूर, बेंगलोर, नाशिक, पुणे, कोल्हापूर येथील बाजार समित्यांमध्ये डिसेंबरच्या सुरवातीला कांद्याला प्रतिक्विंटल ३५०० ते ६००० रुपयांपर्यंत भाव होता. १५ डिसेंबरनंतर कांद्याची आवक काही प्रमाणात वाढली, पण अपेक्षेपेक्षा कमीच कांदा बाजारात असताना देखील सध्या कांद्याचे दर १७०० ते ३६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ४० हजार ३८९ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातील अवघा १२ क्विंटल कांदा ३६०० रुपये दराने विकला गेला आणि तब्बल ४० हजार ३५९ क्विंटल कांदा सरासरी १७०० रुपये दराने विकल्याचे दिसून आले. सरासरी साडेतीन हजार रुपयांवर पोचलेला कांद्याचा दर एका महिन्यात तब्बल १८०० रुपयांनी घसरला आहे. बुधवारी सोलापूर बाजार समितीत ४०३ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. त्यासाठी सरासरी भाव प्रतिक्विंटल सतराशे रुपये तर कमाल भाव तीन हजार ६०० रुपयांपर्यंतच मिळाला.