मुंबई : काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा शिंदे – फडणवीस – पवार सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. काँग्रेस मधील मोठे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट अन्न व औषध प्रशासन मंत्री आत्राम यांनी केला आहे.
धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर आत्राम यांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे. त्यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा लढवण्याची इच्छा होती, मात्र हा मतदारसंघ वाटाघाडीत भाजपच्या वाट्याला गेला. तिथे अशोक नेते हे महायुतीचे उमेदवार आहेत.
आत्राम यांची त्यांची टेस्ट केली पाहिजेत
विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी टीव्ही नाईन मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी आत्राम यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्ये आहे आणि येथेच राहणार आहे. धर्मरावबाबा आत्राम हे खोटं बोलत आहेत, त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, त्यातून सत्य बाहेर येईल. दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे पैसे आहेत पण बुद्धी नाही. त्यांच्या या टीकेनंतर आत्राम यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.