रत्नागिरी : विनायक राऊत यांनी आज दुपारी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर खरमरीत टीका केली. सामंत राज्याला उद्योग मंत्री म्हणून मिळाले, पण ते दुर्दैव आहे. ज्या विषयासाठी डावोसला गेले आहेत, त्या विषयावर बोलायचे सोडून ते गद्दार किती होते, बेइमानीला आपण किती खतपाणी घालतो, अशी दुहेरी स्वप्ने पाहताहेत. अशा उद्योगमंत्र्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. रत्नागिरीत १७ हजार कोटींचा प्रकल्प येणार असे सामंत हे म्हणताहेत. पण तो त्याची खात्री नाही. कारण रत्नागिरी विमानतळ करता करता ते थकून गेले आहेत. केवळ बतावण्या करायाच्या, थापा मारायच्या यापलीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केले हे दाखवून देण्याची आवश्यकता असल्याचे राऊत यांनी सांगितले.
डावोसला जाऊन महाराष्ट्राच्या, कोकणाच्या, रत्नागिराच्या हितासाठी उद्योग आणण्याच्या बहाण्याने उद्योगमंत्री उदय सामंत गेले आहेत. पण तेथे उद्योगपतींशी चर्चा करायची सोडून त्यांना गद्दारीची भाषा करावी लागते, हे दुर्दैव आहे. तेथे जाऊन पक्ष फोडण्याची भाषा केली जात आहे. आता मूळ शिवसेनेतील गद्दारांचे दिवस संपत आले आहेत. कारण भाजप नेत्यांनी त्यांना जागा दाखवायला सुरुवात केली आहे, असे विधान ठाकरे शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राउत यांनी आज येथे केले.
एकनाथ शिंदे गटाला भाजपाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. पद आता नाकारून चालणार नाही, म्हणून उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याया नव्हता. शिंदेंची जागा उदय सामंत घेत असल्याची जोरदार चर्चा होत असल्याच्या विषयावर राऊत यांनी गुगली टाकली आहे. उदय सामंत यांची त्यामध्ये मास्टरकी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत जे बोलले, त्यात तथ्य आहे. कारण काही दिवसांतच १०० टक्के खरे काय आहे ते समोर येईल, असेही राऊत यांनी सांगितले.