ठाणे – महायुतीमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेले विघ्न दुर होऊन ‘नाशिक’मध्ये धनुष्यबाणच हवा, यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडे घातले आहेत. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सवात शुक्रवारी नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दर्शन घेतले. तसेच धनुष्यबाण हा प्रभु श्रीरामाचा तसेच हिंदुहदयसम्राट बाळासाहेबांचा आहे.तो नाशिकमध्ये टिकलाच पाहीजे. यासाठी काम करण्याचे बळ मिळू दे. असे साकडे देवीला घातले. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी, किरण नाकती, स्वप्नील लांडगे, संतोष बोडके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे पुर्वेकडील कोपरी, येथील संत तुकाराम महराज मैदानात श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली.यावेळी माध्यमांशी बोलताना, नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदार संघ आहे.नाशिक म्हटले की, कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्त्वाचे आहेत. आता कुंभमेळा पण जवळ आला आहे. किंबहुना उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व याच जागेवर अवलंबून आहे. ही जागा शिवसेनेसाठी महत्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांना पटवुन देऊ. धनुष्यबाण हा प्रभु श्रीरामाचा तसेच हिंदुहदयसम्राट बाळासाहेबांचा आहे.तो नाशिकमध्ये टिकलाच पाहीजे.अशी आग्रही भूमिका मांडुन बोरस्ते यांनी नाशिकमधुन गोडसे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी गेले १५ दिवस आम्ही भूमिका मांडत आहोत. तरी, हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कोणीही असले तरी, मोदींना पंतप्रधान करणे महत्त्वाचे आहे. आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत, देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ प्लस जागा जिंकुन नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे साकडे देवीला घातल्याचेही बोरस्ते यांनी स्पष्ट केले.