कामगार व पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची अर्थमंत्र्यांना साकडे
मुंबई : अनंत नलावडे
अकोला जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रारूप आराखडा २०२५-२६ मध्ये १९० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी असून या वाढीव निधीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आवश्यक निधी निश्चितपणे उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी जिल्हा पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केलेल्या मागणीवर बोलताना दिली.
जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैस्वाल,आमदार रणधीर सावरकर हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने व विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळावा……
सर्वसाधारण प्रारूप आराखडा २०२५-२६ मध्ये विविध यंत्रणांकडून ९६३.३२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र,शासनाने वित्तीय मर्यादा २४३.९६ कोटी रुपये निश्चित केली आहे.त्यामुळे जिल्ह्यासाठी आवश्यक वाढीव निधी १९० कोटी रुपये आहे.त्यात महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी १५ कोटी,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विविध सुधारणांसाठी २० कोटी,पाच ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांसाठी १ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी ४ कोटी,२८ मोठ्या ग्रामपंचायतींसाठी ५ कोटी,पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी २ कोटी, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेसाठी १५ कोटी,२० यात्रा स्थळांच्या विकासासाठी २ कोटी, ग्रामीण रस्त्यांसाठी २० कोटी अशी विविध अतिरिक्त मागण्या करण्यात आल्या असल्याचे मंत्री ॲड. फुंडकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा तसेच आरोग्य सुविधांसाठी नियोजनपूर्वक वाढीव निधीची गरज असल्याचे सांगून, “जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी व अनुशेष भरून काढण्यासाठी हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा”, अशी मागणीही पालकमंत्री ॲड.फुंडकर यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
त्याचबरोबर, “जिल्ह्यातील नियोजित विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही १५ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा”, असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कामे
जिल्ह्यात २०२२-२३ आणि २०२३-२४ या काळात राबविण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले.
या योजनांमध्ये –
* आदर्श शाळा योजना
* आकार अंगणवाडी केंद्र
* वनपर्यटन केंद्र विकास
*अटल घनवन लागवड योजना
* फळबाग लागवड प्रकल्प
* अकोल्याचा वन स्टॉप ऑल केअर हब म्हणून विकास
* क्रीडा सुविधा विकास
* शासकीय कार्यालयीन इमारतींचे बळकटीकरण
* कृषी वसंत अभियान
* रोव्हरद्वारे मोजणी यंत्रणा
जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत करण्यासाठी १९० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हा निधी निश्चितपणे मंजूर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील विविध योजनांच्या प्रशासकीय मंजुरीसाठी १५ फेब्रुवारीपूर्वी कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी ॲड. फुंडकर यांच्या लक्षात आणून दिले.