सामाजिक बांधिलकी अखंड जपत रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात – मुख्यमंत्री

0

– मोशी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन

मुंबई : तंत्रज्ञान खूप वेगाने वाढत आहे. तसेच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारही वेगाने वाढताना दिसतात. एक प्रकारे तंत्रज्ञान आणि आजार यांची स्पर्धा चाललेली आहे. परंतू नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णाला दिलासा मिळत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा अखंड जपत वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या व अत्याधुनिक सुविधा देण्याचं काम पटवर्धन कुटुंब करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मोशी येथे धनश्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह, रुग्णालयाचे संस्थापक डॉ. राजीव पटवर्धन, रवींद्र भुसारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, अलिकडच्या काळामध्ये आरोग्य सुविधा महागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’ सिस्टीम लागू केली आहे. महात्मा फुले जन आरोग्यच्या माध्यमातून मोठ्या रुग्णालयांमधून १ हजार ३०० सेवा मोफत देण्यात येतात. या माध्यमातून केंद्र शासनाच्या १ हजार ८०० सेवांचे पॅकेज राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. धनश्री रुग्णालयानेही या सेवा दिल्यास गरजू रुग्णांना पैसे नसले तरी उपचार घेता येईल. शासन मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मादाय सहायता कक्षाच्या माध्यमातून कोणत्याही पॅकेज मध्ये न बसणाऱ्या आजारांसाठी अर्थसहाय्य देत असल्याचे सांगून या सेवाही धनश्री रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या दोन्ही कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा या रुग्णालयामार्फत दिल्याने अत्याधुनिक सेवेचा लाभ गरजूंना मिळू शकेल असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, सामाजिक बांधिलकीने पटवर्धन कुटुंब काम करत आहे. या रुग्णालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या सर्जरी तंत्रज्ञानामुळे सोप्या झाल्या आहेत. रोबोटीक सर्जरीमुळे दुसऱ्या कुठल्याही अवयवाला धोका पोहोचत नाही. या सर्व आधुनिक सुविधा देण्याचं काम धनश्री रुग्णालयाने केले आहे.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, उत्तम आरोग्य सेवा सुदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाज प्रगती करु शकतो. आजच्या काळात केवळ मोठ्या शहराममध्येच नव्हे तर ग्रामीण आणि निमशहरी भागातही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची गरज भासत आहे. धनश्री हॉस्पिटलने ही गरज ओळखून १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय सुरु केले आहे. शासनही नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य देत आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत. धनश्री रुग्णालयासारख्या खाजगी संस्थांमुळे या सेवांना पूरक आधार मिळतो व सरकारच्या आरोग्य सेवांना बळकटी येते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक सुविधा व्यवहार्य होत आहेत. महाराष्ट्राने या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे, असे सांगून धनश्री रुग्णालयात रुग्णाला उत्तम सुविधा मिळतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech