महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी – जयकुमार रावल

0

मुंबई : महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. दि. ०६ फेब्रुवारी २०२५ अखेर ५ लाख ११ हजार ६५७ शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ मे.टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. खरेदी केलेला सोयाबीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ३४५ गोदामात तसेच भाडेतत्वावरील २५२ खाजगी गोदामात साठवणूक करण्यात आला आहे. मात्र या हंगामात सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सदर गोदामांची साठवणूक क्षमता देखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने सन २०२४-२५ करीता सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ४८९२ रुपये इतका हमीभाव घोषित केला असून तो मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा २९२ रुपये प्रति क्विंटल इतका जास्त आहे. नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सीअंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल एजन्सीमार्फत शेतकरी नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यासाठी नाफेडद्वारे ४०३ व एनसीसीएफद्वारे १५९ अशी एकूण ५६२ केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आली. सोयाबीन खरेदीसाठी दि. १ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात येऊन दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ९० दिवसांची मुदत दि.१२ जानेवारी २०२५ पर्यंत होती. मात्र शेतकरी नोंदणीचे प्रमाण विचारात घेऊन खरेदी प्रक्रियेस केंद्र शासनाच्या मान्यतेने प्रथम दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आणि नंतर दि. ०६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती पणन विभागामार्फत देण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech