सोलापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीपात्रातील पाणी प्रदूषित झाले असून पाण्यात आळ्या आणि किडे तयार झाले आहेत. अशा घाण पाण्यातच भाविकांवर स्नान करण्याची वेळ आली आहे. नदीपात्रातील घाण पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय ऐन माघी यात्रेत जीबीएसचा धोका वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. शनिवारी (ता. ८) माघी यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक चंद्रभागा स्नान करून तीर्थ म्हणून नदीतील पाणी पितात. या घाण पाण्यामुळे जीबीएससारखा धोकादायक आजार फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप चंद्रभागेत पाणी सोडण्यात आले नाही. नदीत शेवाळचे थर साचले आहेत. त्यातच वाळवंटात देखील घाणीचे साम्राज्य पसरले आहे.