केंद्रीय अर्थसंकल्प : देशाला आर्थिकरित्या मजबूत, आत्मनिर्भर आणि वैश्विक शक्ती बनविण्याच्या दिशेने – खा. म्हस्के

0

नवी दिल्ली : सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन ही विचारधारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची आहे. हाच सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेऊन यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. याबद्दल शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे आभार मानत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आर्थिकरित्या मजबूत, आत्मनिर्भर आणि वैश्विक शक्ती बनविण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचा विश्वास ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत अर्थसंकल्पीय चर्चासत्रात बोलतांना व्यक्त केला.

आम्ही कॉमन मॅनचा विचार करतो तर विरोधी पक्षात बसलेला एक कॉर्न मॅन फसवणूक करुन, खोटे बोलून जनतेचे शोषण करत आहे. कधी ते अभय मुद्रामध्ये जातात तर कधी आपल्या भाषणात हलव्याला मलाई म्हणतात. त्यांच्याकडून जनतेला कोणतीच अपेक्षा नसल्याने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे तोंड काळे केले असल्याची टिका खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते राहूल गांधी आणि काँग्रेसवर केली.

राष्ट्रपती पद हे सर्वोच्च पद आहे. आम्हाला अभिमान आहे की आज या पदावर द्रोपदी मुर्मू विराजमान आहेत. आपल्या मेहनत आणि त्यागामुळे त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र काँग्रेसने आदिवासी समाजातून येणाऱ्या महिलांचा अपमान केला आहे. आधी सोनिया गांधी यांनी अपमानजनक शब्द वापरले. अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरले. त्यांना बघवत नाही की, देशाचे नेतृत्व आज आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती आणि एक सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती पंतप्रधान आहे. म्हणूनच काँग्रेस वेळोवेळी त्यांचा अवमान करत असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

पंतप्रधान आवास योजनेतून ३ कोटी कुटुंबांना घर मिळणार असून ५ लाख ३६ हजार कोटी खर्च या योजनेवर होणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यासह ठाणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात आरोग्य सेवा महाग होती. मात्र आता आयुष्यमान भारत योजनेतून १२ कोटी कुटुंब आणि 55 कोटी नागरिक उपचार घेत आहेत. ७० वर्ष व त्यावरील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंत उपचार विमा मिळाला आहे. गरीब, युवा, अन्नदाता, नारीशक्ती सक्षमिकरणाला हा अर्थसंकल्प समर्पित असल्याची भावना खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली. मध्यमवर्गीयांसाठी १२ लाखांपर्यंत आयकर मधून सुट, आर्थिक मजबुती, कर सुधार, कृषी विकास, स्टार्टअपला प्राधान्य, रोजगार निर्मिती, टेकनॉलॉजीमध्ये आत्मनिर्भर हा अर्थसंकल्पाचा गाभा खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech