नाशिक : येथील आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये कार्यरत असलेले नाईक संदीप सिंह यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यासह हेरगिरी करणाऱ्या इतर दोन आरोपींनाही राजस्थानवरून अटक करण्यात आली आहे. याद्वारे त्याने आयएसआयला गुप्तचर माहिती आणि लष्कराची गुपिते पुरवली आहेत. आरोपीने या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण १५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. एसएसपी चरणजित सिंह सोहल आणि एसपी हरिंदर सिंह यांनी सांगितले की, आरोपी संदीप सिंहने सैन्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती विकली आहे.
एसएसपींनी सांगितले की, आरोपी संदीप सिंह २०१५ मध्ये सैन्यात भरती झाला होता. पटियालामधील सरदुलगड येथील रहिवासी संदीप सिंह त्याच्या साथीदारांसह देशातील अनेक लष्करी छावण्यांबद्दल माहिती गोळा करत आहे आणि ती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला पाठवत होता. आरोपी काही दिवसांपूर्वी रजेवर पटियालाला आला होता. संधी मिळताच घरिंडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला पटियाला येथूनच अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने अनेक गुपिते उघड केली आहेत. यापूर्वी पोलिसांनी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमृतपाल सिंहलाही अटक केली होती. आयएसआयच्या सूचनेनुसार, आरोपीने फिरोजपूरमधील एका निर्जन ठिकाणी अमृतपाल सिंहला २ लाख रुपये दिले होते.
भारतीय सैन्य दलामध्ये काम करणाऱ्या जवानांकडून लष्कराविषयी महत्वाची माहिती आयएसआयला देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्यावरती काम करून राजस्थान वरून अमृतपाल सिंह उर्फ अमृत, राजवीर सिंह या दोन आरोपींना अटक केली. दरम्यान राजस्थानमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दहा लाख रुपये, ट्रक, एक पिस्तुल, कार हस्तगत करण्यात आलेली आहे.