लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

0

मुंबई : “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ” ही योजना कधीही बंद पडणार नाही!” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थाने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. “भांडे घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, याचा प्रश्न होता. पण ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला,” असे म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार करतोय,” असे आश्वासन दिले. या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती, तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. “आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली,” असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, “सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत.” यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “शासन पातळीवर या मागणीचा विचार करू,” असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या भेटीचे आयोजन “रसिकाश्रय” संस्थेने केले होते. “या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. “मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकल्यावर हृदय हलकं झालं,” असे एका महिलेने समाधानाने सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech