नॅरेडको सारख्या संस्थांनी एसटीच्या पुनरुत्थनांमध्ये योगदान द्यावे – सरनाईक

0

मुंबई : राज्यभरात मोक्याच्या ठिकाणी पसरलेल्या एसटीच्या ” लँड बँक” चा विकास करण्यासाठी नॅरेडको (National Real Estate Development Council) सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या अनुभवाचा फायदा एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देखील करून द्यावा! असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले . ते जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटर (BKC) येथे या संस्थेच्या वार्षिक समिटमध्ये उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष हरिबाबू, राजन बांदेकर, निरंजन हिरानंदानी, जय मोरझारीया व देशभरातील विकासक – उद्योजक उपस्थित होते.

मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, एसटीची राज्यभरात ८४० पेक्षा जास्त ठिकाणी सुमारे ३००० पेक्षा जास्त एकराची ” लँड बँक ” आहे. ती प्रामुख्याने जिल्हा, तालुका आणि ग्रामीण अशा तीन गटांमध्ये आपण विभागलेली आहे. या जमिनीचा एकत्रित विकास करण्यासाठी एस टी महामंडळ लवकरच निविदा प्रक्रिया राबत आहे. तथापि मोठ्या शहरातील मोक्याच्या जागांसाठी विकासक मोठ्या संख्येने इच्छुक असतात, परंतु तालुका आणि ग्रामीण भागासाठी तितक्या प्रमाणात विकासक इच्छुक नसतात. हे ओळखून या निविदा प्रक्रियेमध्ये एक मोठ्या शहरातील मोक्याची जागा तसेच तालुका आणि ग्रामीण क्षेत्रातील इतर जागांसह संयुक्तपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचा विचार आहे.

जेणेकरून विकासकाबरोबर एसटीचा देखील फायदा होईल! अशा निविदा प्रक्रियेमध्ये विकासकांना त्यांच्या आवडीच्या भूखंडाबरोबरच इतर दोन भूखंड देखील विकसित करणे आवश्यक असेल, त्यामुळे एसटीच्या इतर मोकळ्या जागेचा देखील विकास होऊ शकतो. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. ” भविष्यात एसटीच्या जास्तीत जास्त जमिनीचा खाजगी – सार्वजनिक भागीदारीतून विकास व्हावा आणि त्यातून प्रीमियमच्या स्वरूपामध्ये एसटीला चांगला निधी उपलब्ध व्हावा, तसेच एसटीची बसस्थानके, आगार व इतर आस्थापना बांधून घेणे यासाठी ” नॅरेडको ” सारख्या संस्था पुढे आल्या पाहिजेत! ” असे आवाहन यावेळी मंत्री प्रताप सरनाईक केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech