रत्नागिरी : महाराष्ट्र मोटर वाहन विभागामार्फत दिशा राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पुण्यातील बालेवाडी येथे साजरा झाला. त्यामध्ये रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील लिपीक राधा बसणकर यांनी धावण्याच्या शर्यतीत 4X100 रिलेमध्ये सुवर्णपदक, १०० मीटर धावण्यात आणि ५ किमी धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धा चार दिवस सुरू होत्या. स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. यामध्ये २५ क्रीडा प्रकारांत पुरुष व महिलांच्या ४५ वर्षांखालील व ४५ वर्षांवरील अशा वयोगटात स्पर्धा झाल्या. स्पर्धेमध्ये सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धांसाठी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते हार्दिक जोशी, भूषण कडू, शाहीर नंदेश उमप, परिवहन विभागातील सर्व अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील यशाबद्दल राधा बसणकर यांनी सांगितले की, शाळा-महाविद्यालयात असताना खो-खो, मैदानी स्पर्धांमध्ये मी सहभागी होत होते. मात्र नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे खेळाची आवड मागे पडली. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या पहिल्या पर्वामुळे ही संधी पुन्हा उपलब्ध झाली. प्रॅक्टिस रनच्या माध्यमातून सराव चालू राहिला. कोकण कोस्टलचे प्रसाद देवस्थळी, डॉ. नितीन सनगर, मानसी मराठे, अविनाश फडके तसेच इतर ग्रुप मेंबर्स यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे व कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आरटीओच्या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू शर्यतीत असतानासुद्धा पदक मिळवता आले.