मुंबई : पूर्वी चाळ संस्कृती होती. वातावरण खेळीमेळीचे होते. सुखदुःखात सारे जण एकमेकांच्या मदतीला धावून जात असत. ही चाळ संस्कृती उत्तम होती पण आता ब्लॉक्स संस्कृती बोकाळलीय आणि त्यात सगळेच ब्लॉक झाले आहेत. कुणाच कुणाला मेळ नाही. सुख दुःखाची पर्वा नाही. आई वडिल वृद्धाश्रमात आणि मुले विदेशात. अंत्यसंस्कारासाठी यायला मुलांना वेळ नाही. म्हणून सांगतो एकमेकांना साद घालत जा, शेजारीपाजारी यांच्याबरोबर सौहार्दाचे संबंध ठेवा तेच उपयोगाला येतील, अशा शब्दांत एअर इंडिया चे सेवानिवृत्त अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. पुष्पकांत ऊर्फ तात्यासाहेब पिंपळे यांनी विदारक वास्तव मांडले.
बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहोळ्यात श्री. पुष्पकांत ऊर्फ तात्यासाहेब पिंपळे हे अध्यक्षस्थानावरुन संबोधित करीत होते. *वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या हेमचंद्र मानकामे, विलास सुर्वे, सुनेत्रा एडवणकर, सुभाष लाड, भीमरथी वेर्लेकर, मनीषा पाटील या सदस्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहोळ्यानिमित्त तात्यासाहेब पिंपळे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. नव्वदी ओलांडलेल्या सरलाताई भोसेकर यांनाही सन्मानित करण्यात आले. सुरेंद्र कामत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर मोहन शेजवलकर, रवींद्र रानडे, शमा शेडगे, उषा कुलकर्णी यांनी उत्सवमूर्तींचा परिचय करून दिला तर बा. द. जोशी यांनी अभीष्टचिंतन श्लोक म्हणत शुभेच्छा दिल्या.
संजय देशपांडे यांनी स्वागत गीत, कार्यवाह स्मीता चितळे यांनी प्रास्ताविक, अध्यक्षा रुचिरा दिघे यांनी अध्यक्षीय मनोगत, सूत्रसंचालन मोहन शेजवलकर यांनी तर गजानन बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले. वर्धापन दिनानिमित्त रामदास कामत यांचा व्यथा संसाराची हा खुमासदार कार्यक्रम सादर करण्यात आला. दहिसर येथील प्रख्यात विठ्ठल मंदिराचे विश्वस्त मधुसूदन पै, एअर इंडियाच्या सेवानिवृत्त अधिकारी सौ. मीना नाईक इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.