भारत ऊर्जा सप्ताह जगातील दुसरे सर्वात मोठे ऊर्जा व्यासपीठ म्हणून स्थापित – हरदीप सिंग पुरी

0

नवी दिल्ली : अवघ्या तीन वर्षांच्या अल्पावधीतच भारत ऊर्जा सप्ताहाने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऊर्जा व्यासपीठ म्हणून स्वतःला स्थापित केले आहे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. चौथा भारत ऊर्जा सप्ताह कार्यक्रम गोव्यात होणार असल्याचेही ते म्हणाले. भारत ऊर्जा सप्ताह २०२५ च्या समारोप कार्यक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या कार्यक्रमाला लाभलेले अभूतपूर्व यश अधोरेखित केले. सहभागी आणि प्रदर्शनात सहभाग नोंदवणाऱ्यांच्या तसेच तांत्रिक अभ्यास सादर करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, हरित ऊर्जा, जैवइंधन आणि सीबीजी यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश करून या कार्यक्रमाने अपेक्षा उंचावल्या आहेत, तसेच उल्लेखनीयरित्या नवोन्मेषी विकासाचे दर्शन घडवले आहे,असे पुरी यांनी सांगितले.

केवळ नेटवर्किंगचा मंच म्हणून मर्यादित न राहता प्रत्यक्ष व्यावसायिक व्यवहार सुलभ करून भारत ऊर्जा सप्ताह २०२५ ने इतर जागतिक ऊर्जा मंचांपेक्षा आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे, पुरी यांनी सांगितले. हरदीप सिंग पुरी यांनी एचपीसीएल स्टॉलवर प्रदर्शित केलेल्या किफायतशीर रूपांतरण किटसारख्या व्यावहारिक नवकल्पनांवर विशेषतः प्रकाश टाकला, जो दुचाकी आणि तीन चाकी वाहनांमध्ये जैवइंधनाचा वापर सक्षम करण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदार, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातल्या अभिसरणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः फ्लेक्स इंधन वाहनांच्या प्रदर्शनात ते दिसून आले.

भारत-अमेरिका ऊर्जा सहकार्याबाबत बोलताना पुरी यांनी सद्विपक्षीय संबंधांमध्ये, विशेषतः नैसर्गिक वायू क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीचा उल्लेख केला.आपल्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वापर सध्याच्या सुमारे ६% वरून १५% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट अधोरेखित करताना द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) पुरवठ्यासाठी अमेरिकेशी असलेल्या संबंधांचे धोरणात्मक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

अमेरिकेच्या नव्या प्रशासनाने तेल पुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे जागतिक बाजारपेठेत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निरीक्षण पुरी यांनी जागतिक ऊर्जा परिस्थितीवर चर्चा करताना नोंदवले. ब्राझील, अर्जेंटिना, सुरीनाम, कॅनडा, अमेरिका आणि गयाना यासारख्या पश्चिम गोलार्धातला नवीन तेल स्रोतांचा उदय भारतासारख्या प्रमुख तेल वापरणाऱ्या राष्ट्रांसाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरी यांनी ब्राझील, व्हेनेझुएला, रशिया आणि मोझांबिकमधील तेल आणि वायू संपत्तीमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.

हरदीप सिंग पुरी यांनी जैवइंधन उपक्रमाचे वर्णन उल्लेखनीय यशोगाथा म्हणून केले. या अंतर्गत सध्या १,७०० कोटी लिटर इथेनॉल मिश्रण क्षमता साध्य झाली असून २०% मिश्रण लक्ष्यापेक्षा अधिक क्षमतेबाबत त्यांनी चर्चा केली. याखेरीज पुरी यांनी हरित हायड्रोजनबद्दल विशेष उत्साह व्यक्त केला. वर्ष २०३० साठी ५ एमएमटी वार्षिक उत्पादन लक्ष्याप्रती प्रगतीची पुष्टी त्यांनी केली. तसेच शाश्वत हवाई इंधन विकासाचाही त्यांनी उल्लेख केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech