मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव हे देखील पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते. मात्र, आपण नाराज नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. तरीही, आज त्यांनी व्हॉट्सअपला ठेवलेल्या स्टेटसवरुन पुन्हा एकदा भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली असून पक्षाला जय महाराष्ट्र करत अनेकजण शिवसेना शिंदे गटात तर काहीजण भाजपात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधीकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातही आता शिवसेना शिंदे गटाने आपलं वर्चस्व स्थापित केल्याचं दिसून येत आहे.
राजन साळवींनंतर आता भास्कर जाधव देखील शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सची सध्या जोरदार चर्चेत कोकणातील राजकारणात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात’, अशा आशयाचे स्टेट्स भास्कर जाधव यांनी ठेवलं आहे. संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा हा व्हिडिओ स्टेट्स ठेवत भास्कर जाधव यांनी पुन्हा लक्ष वेधलं आहे.
आपल्या स्टेट्समध्ये त्यांनी उल्लेख केलेला तो म्होरक्या कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण, स्टेटसमधील व्हिडिओत एक मेंढ्याचा कळप पाण्यातून जात असल्याचे दिसून येते, त्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन हा कळप पुढे जात असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ४० पेक्षा जास्त आमदारांनी देखील अशाचप्रकारे गुवाहटी गाठली होती. त्यामुळे, भास्कर जाधव यांचे हे स्टेटस एकनाथ शिंदेंच्या नेतृ्त्वाशी मिळते-जुळते तर नाही ना, असा तर्क लावला जात आहे.