भोजपुर : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामुळे बिहारमधील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.अशातच आरा स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढता न आल्याने प्रवाशांनी आरा स्टेशनवर संपूर्ण क्रांती ट्रेनची तोडफोड केली.या तोडफोडीत एसी कोचची काचही फुटली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण क्रांती ट्रेन आरा स्टेशन येथे २ मिनिटं थांबते. जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा आत आधीच बसलेल्या प्रवाशांनी ट्रेनचे दरवाजा बंद केले होते. यामुळे ज्या प्रवाशांकडे तिकीट होते त्यांना ट्रेनमध्ये चढता आलं नाही. अशा परिस्थितीत काही प्रवाशांकडून ट्रेनची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.यानंतर दानापूर रेल्वे विभागाचे डीआरएम जयंत कुमार चौधरी आरा स्टेशनवर पोहोचले. त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनची पाहणी केली.
यानंतर डीआरएमने म्हटलं आहे की, प्रवाशांची सुरक्षा रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी आरपीएफ आणि व्यावसायिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले.तसेच जेव्हा जेव्हा कोणतीही ट्रेन येते तेव्हा प्रवाशांचे हित लक्षात घेऊन, गरज पडल्यास ती आणखी १० ते १५ मिनिटं थांबवावी. जर प्रवाशांना ट्रेनमध्ये जागा मिळत नसतील तर त्यांना त्यानंतर येणाऱ्या ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी द्यावी. बिहारहून पश्चिमेकडे जाणाऱ्या गाड्या अजूनही हाऊसफुल्ल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रयागराजला जाण्यासाठी आरा रेल्वे स्थानकावर लोकांची मोठी गर्दी जमत आहे. परिस्थिती अशी आहे की, गाड्यांमध्ये गर्दी जास्त असल्याने लोकांना चढताना आणि उतरताना खूप अडचणी येत आहेत.