शरद पवार, शिवराज पाटील चाकूरकर, संजय राऊत यांची उपस्थित
मुंबई: दैनिक सामना चे दिल्ली ब्युरो चीफ पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी यांनी लिहलेल्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उदया (ता.२०) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला रंगणार आहे.
राष्ट्वादी कांगेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन राजधानीतील नवीन महाराष्ट्र सदनात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाचे नेते खासदार आणि दैनिक सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पंजाबचे कृषी सचिव अजित जोशी (आयएएस), लक्ष्मीकांत खाबिया यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असेल.
भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहले असून, यात भारतीय लोकशाहीच्या इतिहास व वर्तमानाचा धांडोळा घेण्यात आला आहे. संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकात देशाच्या लोकशाहीचा प्रवास चितारण्यात आला आहे. संसद भवनाचा इतिहास, ऐतिहासिक घटनाक्रमस संसदेतील ऐतिहासिक भाषणे, आजवरच्या पंतप्रधानांनी देशासाठी दिलेले योगदान, पंतप्रधान निवडीवेळी पडद्याआड रंगलेले राजकारण, लोकसभा सभापतींनी उमटवलेला ठसा, महाराष्टातील नेत्यांनी दिल्लीच्या राष्टीय राजकारणात उमटविलेल्या कार्यकर्तृत्वाच्या मुद्रा, संसदेतील काही हळुवार मिश्कील प्रसंग काही कटू प्रसंग या पुस्तकातून रेखाटलेले आहेत. श्री. संजय राऊत यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहली असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या पुस्तकासाठी अभिप्राय लिहला आहे. पुण्याच्या अनासपुरे पब्लिकेशन कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. महाराष्टातील अनेक लोकप्रतिनिधी, साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि दिल्लीतील मराठी जनांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.