रत्नागिरी : दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयावर धडकले. ही गाडी दादरवरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाची तीन दिवसांत पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.
जवळपास २० वर्षांहून अधिक काळ रत्नागिरी ते दादर मार्गावर सुरू असलेली पॅसेंजर गाडी करोना काळापासून दिव्यापर्यंतच जाऊ लागली आहे. ती पुन्हा पूर्वीप्रमाणे दादर ते रत्नागिरी याच मार्गावर सोडली गावी यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. मागील भेटीच्या वेळी त्यांनी यासाठी एक मार्च रोजी रेल रोकोचा इशारादेखील दिला आहे. त्यावर आपण ठाम असल्याचे सावंत यांनी सांगितले.
यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु यावेळच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी दादरहून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम कसा होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी मीना यांनी त्या पर्यायांबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिव्यापर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसांत करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.