नवी दिल्ली : येथील महाराष्ट्र सदनच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार श्रीमती आर. विमला यांनी आज स्वीकारला. कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयात आज श्रीमती विमला यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार आणि व्यवस्थापक भगवंती मेश्राम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी कस्तुरबा गांधीस्थित नवीन महाराष्ट्र सदनाची पाहणी केली.
श्रीमती विमला यापुर्वी समग्र शिक्षाच्या राज्य प्रकल्प संचालक या पदावर कार्यरत होत्या. महाराष्ट्रातील सरकारच्या विविध विभागांमध्ये जबाबदारीच्या पदावर ३० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. त्यात नागपूर जिल्हाधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, जलजीवन मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, उद्योगांचा विकास आणि फिल्मसिटी आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी सुमारे पाच लाख बचत गट आणि समुदाय आधारित संघटना निर्माण केल्या आहेत, ज्यातून ५० लाखांहून अधिक कुटुंबे जोडली गेली आहेत. या गटांनी १८ लाखांहून अधिक कुटुंबांमध्ये शाश्वत उपजीविका निर्माण केली आहे ज्यामध्ये, शाश्वत शेती करणाऱ्या १४ लाख महिला शेतकरी समाविष्ट आहेत याची आर्थिक उलाढाल ११०० कोटी रुपयांपर्यंत आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे स्वागत महाराष्ट्र सदन निवासी आयुक्त कार्यालयाच्या सचिव तथा निवास आयुक्त आर. विमला यांचे दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती बागुल यांनी यावेळी दिली.