सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी ठाणे येथील एका दानशूर भक्ताने ५४० ग्रॅम वजनाचा (सुमारे अर्धा किलो) सोन्याचा मुकूट अर्पण केला. आजच्या बाजारात या सुवर्ण मुकुटाची अंदाजे किंमत ५४ लाख रुपयांच्या आसपास आहे. या कुटुंबाचा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे देवीजींची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडेकर, सुरक्षा निरीक्षक ऋषीकेश पाटील, धार्मिक विभागाचे अमोल कर्डीले आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या गाभार्यासह चांदीच्या सिंहासनाला विविध प्रकारच्या द्राक्ष फळांनी सजविण्यात आले होते.
सध्या तुळजापूर व परिसरात द्राक्ष बागांची छाटणी सुरू असल्याने असंख्य बागायतदार द्राक्षांचा पहिला बहार मातेचरणी अर्पण करुन द्राक्ष बाजारात विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. यंदा द्राक्षासाठी नैसर्गिक वातावरण पोषक असल्याने तालुक्यात दर्जेदार द्राक्ष विक्रीसाठी येत आहेत. मात्र १०० ते ८० रुपये प्रति किलोने होणार्या विक्रीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. गतवर्षी द्राक्षांचा प्रति किलोचा दर ४० ते ५० रुपये किलो होता.