नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग ऍडव्हान्स्ड मटेरिअल्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाक यांग सीआँग यांच्यामध्ये बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादनासंदर्भात ₹१७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला.
सदर करारानुसार एच एस ह्युसंग कॉर्पोरेशनकडून बुटीबोरी, नागपूर येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन प्रकल्पासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण ₹१७४० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे ४०० स्थानिक रोजगारसंधी निर्माण होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ह्युसंग कंपनी नागपूरच्या बुटीबोरी येथे नवा अध्याय सुरू करत असून, कंपनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसोबतच आता नागपुरात आपल्या कार्याचा विस्तार करत असल्याचे पाहून आनंद होत आहे. महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणुकीसाठी पुढे येत राहतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एच एस ह्युसंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.