*३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन*
*राज्यभरातील ३ हजार पोलिसांचा क्रीडा स्पर्धेत सहभाग*
ठाणे :- साकेत येथील पोलीस मैदानात हायमास्क दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना, ठाणे पोलीस मुख्यालयाच्या पुढाकाराने या क्रीडा स्पर्धांचे अतिशय यशस्वी अयोजन केल्याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष अभिनंदन केले.
१२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत ३ हजार पोलीस विविध प्रकारचे १८ खेळ खेळणार आहेत. त्यादृष्टीने पाहिल्यास हे महाराष्ट्राचे महा-ऑलिम्पिक असल्याचे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.
या क्रीडा स्पर्धेत अपल्यातील क्रीडा गुणांना वाव मिळेल. यावेळी आरोपीला सोबत घेऊन, किंवा कोर्टाची तारीख म्हणून तुम्ही ठाणे शहरात आले नसून खेळ खेळण्यासाठी इथे आलेले आहात, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस हेच खरे खिलाडी नंबर १ आहेत हे सिद्ध करून दाखवा असे आवाहन केले. खेळ खेळताना कायम एकमेकांना सोबत घ्यावे लागते, त्याने संघभावना वाढते, फिटनेस राखण्यास मदत होते, मनावरील ताण कमी होतो. पोलीस दलातील अनेक पोलीस बांधव-भगिनी हे वेगवेगळ्या खेळात कायम आघाडीवर असतात. त्यामुळे याचीच चुणूक या क्रिडा स्पर्धेत नक्की पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या स्पर्धेत पंचनामा नसेल तर पंच असतील, डायरी बनेल ती फक्त तुमच्या रेकॉर्डची, त्यामुळे निर्धास्त होऊन खेळा असे आवाहन पोलीस बांधवांना केले. पोलीस रस्त्यावर उभा असतो म्हणून नागरिक आपल्या घरात सुरक्षित असतात याची पूर्ण जाणीव मला आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरीही पोलीस कायम सज्ज असतात, कोरोना काळात तर पडेल ते काम तुम्ही सगळ्यांनी केले याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आव्हानात्मक परिस्थिती सांभाळायला शारीरिक स्फूर्ती गरजेची असते.
आता बदलत्या काळात बदललेली आव्हाने सांभाळण्यासाठी या खेळात सहभागी होऊन स्वतःची तंदुरुस्ती अजमावून पहा असे आवाहन यावेळी केले. या स्पर्धेत कुणीही विजयी झाले तरीही माझ्यासाठी तुम्ही सारे विजयी आहात असे निक्षून सांगितले. तसेच एवढ्या कमी वेळात या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी या स्पर्धेची क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे औपचारिकरित्या उद्घाटन केले. तसेच पोलिस बांधवांना खिळाडूवृत्ती आणि प्रामाणिकपणे या स्पर्धेत सहभागी होण्याची शपथ दिली.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव आणि पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले पोलीस बांधव भगिनी आणि पोलीस कुटूंबीय उपस्थित होते.