परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई : अनंत नलावडे
राज्यातील सर्व बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (Security Audit) करावे, तसेच बसस्थानक व आगारांमध्ये उभ्या असलेल्या निर्लेखन बसेस आणि परिवहन कार्यालयांकडून जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करावे, असे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकांवरील सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदासाठी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव गृह विभागाला तातडीने सादर करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या दालनात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक पार पडली.या बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष (प्रभारी) विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, अशीही माहिती त्यांनी दिली.
मंत्री सरनाईक यांनी निर्देश दिले की, राज्यातील सर्व एसटी बसस्थानक व आगारांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित असावी. नवीन बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करावे.तसेच सर्व बस गाड्यांमध्येही जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करावे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बसस्थानकांवर गस्त वाढवावी, आगार व्यवस्थापकांनी आगाराच्या निवासस्थानीच वास्तव्य करावे, जेणेकरून २४ तास व्यवस्थापनावर लक्ष राहील,प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्यात यावे,जेणेकरून फसवणूक होणार नाही,बसस्थानक आणि बसेसच्या सुरक्षिततेसाठी काटेकोर नियम,प्रत्येक आगारात आलेल्या बसेसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे करणे बंधनकारक.
चालक व वाहकांनी आगार सोडताना बस पूर्णतः बंद असल्याची खात्री करावी.साध्या बसेसमध्ये दरवाजे आणि खिडक्या बंद करण्याची जबाबदारी चालक व वाहकांची असेल. सुरक्षा रक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करावी, आदी प्रमुख सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले
परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, बसस्थानकांवरील स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये. तसेच प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर प्रशस्त व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.त्याचवेळी राज्यातील परिवहन यंत्रणा अधिक सुरक्षित आणि प्रवासीहितासाठी सक्षम बनवण्यासाठी या उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.