राज्यात प्राध्यापक भरतीला मंजुरी, नवीन कार्यपद्धती लागू…..!

0

मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

मुंबई : अनंत नलावडे

राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली असून, भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी नवीन कार्यपद्धती लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली.

राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली असून यात शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनाला ८०% आणि मुलाखतीसाठी २०% गुण राखीव ठेवण्यात आले आहेत.१०० पैकी किमान ५० गुण मिळवणारे उमेदवार अंतिम निवडीसाठी पात्र ठरणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

निवड प्रक्रियेत परिसंवाद,व्याख्यान प्रात्यक्षिके,अध्यापन कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असेल.तसेच निवड समितीच्या बैठकीचे दृक-श्राव्य चित्रिकरण केले जाणार असून सीलबंद करून सुरक्षित ठेवले जाईल.मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केल्याची माहितीही त्यांनी दिली.

सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियांना नवीन नियमांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली असून, भविष्यातही हीच कार्यपद्धती सर्व विद्यापीठांमध्ये लागू राहील.त्यामुळे गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होईल, तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावेल, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

..

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech