काँग्रेस नेते नाना पटोले यांचा सवाल
मुंबई :अनंत नलावडे
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळातील आरोग्य विभागातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित कंत्राटाला स्थगिती दिली.मात्र,आरोग्य विभागाप्रमाणेच इतर विभागांतील घोटाळेबाज कंत्राटांनाही स्थगिती देणार का? असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सोमवारी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिला.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप-युती सरकारवर तीव्र टीका केली.”या सरकारमध्ये तिघांची तीन तोंडे आहेत.मात्र केवळ ते मलई लाटण्यासाठी आणि पालकमंत्री पदांसाठी भांडत आहेत.”असाही टोला पटोले यांनी लगावला.
यावेळी पटोले यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर थेट आरोप करताना सांगितले की,”या सरकारमधील ६५ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची चर्चा होतेय, पण बाकीचे दागी मंत्री कोण?” मुख्यमंत्री फडणवीस यांनी खरोखरच धमक असेल, तर त्यांनी सर्व दागी मंत्र्यांवर कारवाई करावी,असा आव्हानच त्यांनी यावेळी दिले.
“शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागाप्रमाणेच अन्न व नागरी पुरवठा, जलसंपदा, बांधकाम आणि कृषी विभागांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहेत.कृषी विभागातील काही घोटाळे आम्ही उघड केले आहेत.आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व भ्रष्टाचारी फाईलींमध्ये लक्ष घालावे आणि चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.”अशी मागणीही पटोले यांनी केली.
यावेळी त्यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेची परिस्थितीही अत्यंत गंभीर असल्याचा आरोप करताना पटोले म्हणाले,”महिला सुरक्षित नाहीत,केंद्रीय मंत्र्यांची मुलगीही सुरक्षित नाही.बीड, परभणी,स्वारगेट येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडे तक्रार देऊनही सरकार काही करत नाही.”बीड घटनेतील आरोपींना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “यावर मुख्यमंत्री उत्तर देणार का? सरकारचा आशिर्वाद असल्यामुळेच गुन्हेगारी वाढल्याचाही आरोप त्यांनी केला.
नागपूर अधिवेशनात बीड आणि परभणी येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला होता.मात्र, मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती दिली.त्यामुळे परभणी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत, असा इशाराही पटोले यांनी दिला.त्याचवेळी राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कारण पोलिस महासंचालक निष्क्रिय असल्याने गुन्हेगारी वाढत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात जाणीवपूर्वक असुरक्षितता वाढवली जात आहे का? असा सवालही पटोले यांनी केला.
“मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांतील भ्रष्टाचाराचीही चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आम्ही सरकारला जाब विचारू.” असाही इशारा त्यांनी दिला.