प्रादेशिक पर्यटन विकास: केडीएमसीने सादर केलेल्या दिड कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी द्या – माजी आमदार नरेंद्र पवार

0

टिटवाळा गणपती मंदिर सुशोभीकरणासाठी दीड कोटींचा निधी द्या..नरेंद्र पवार यांचे पर्यटनमंत्र्यांना साकडे

*अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत केली मागणी*

कल्याण : ठाणे जिल्हा नियोजन समितीने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन विभागाला सादर केलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली.  

ठाणे जिल्हा नियोजन समितीने पर्यटन योजना २०२३-२४ अंतर्गत पर्यटन विभागाचे सह संचालकांकडे गेल्या वर्षी हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यामध्ये टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण, श्री गणेश मंदिर परिसरातील सुशोभीकरण, श्री गणेश मंदिरातील दर्शन रांगेमध्ये रेलिंग लावणे – रॉड टाकणे, श्री गणेश मंदिर परिसरातील उद्यानात आसन व्यवस्था उभारून विकासकामे करणे, श्री गणेश मंदिराबाहेरील पार्किंग परिसरात आवश्यक कामे करणे आणि पाण्याचा सुयोग्य निचरा होण्यासाठी नाला बंदिस्त करणे यासह टिटवाळा महागणपती मंदिर परिसरातील तलावाचे सुशोभीकरण करणे अशा महत्त्वाच्या सहा विकासकामांचा या प्रस्तावात समावेश असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने या ६ विकासकामांचे सविस्तर अंदाजपत्रक आणि आराखडे तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मान्यता तसेच निधी उपलब्ध करण्यासाठी पर्यटन विभागाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावाला लवकरात मान्यता देऊन १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत अशी आग्रही मागणी पवार यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे.

दरम्यान पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वस्त केल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर परिसराचा कायापालट होण्यास मोठी मदत होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech