मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिवसंवाद दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुंबईतील लोकसभानिहाय मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. शिंदे संवाद साधणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात शुक्रवार ७ मार्च रोजी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघापासून होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले होते.
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेत देखील शिवसेनेला प्रचंड यश मिळाले. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वात लोकसभेत शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले तर विधानसभेत ६० आमदार निवडून आले. विधानसभेत शिवसेनेला उबाठाच्या तुलनेत १५ लाख ६३ हजार जास्त मते मिळाली. राज्यातील मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. मुंबईत शिवसेनेने ११ जागांवर थेट उबाठा उमेदवारांशी लढत दिली. यात ६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. शिवसेनेचे आणि मुंबई महापालिकेचे भावनिक नातं आहे. मुंबईकरांनी नेहमीच धनुष्यबाणाला मतदान करुन शिवसेनेचा महापौर निवडून दिला आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवून महायुतीचा महापौर करण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मुंबईतील लोकसभानिय मतदार संघांमध्ये शिवसंवाद दौरा करणार आहेत.
खासदार डॉ. शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून होणार आहे. घाटकोपरमध्ये दुपारी १२ वाजता घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. शिंदे संवाद साधतील. त्यानंतर भांडूप येथे दुपारी २ वाजता मुलुंड, भांडूप आणि विक्रोळी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. शिंदे चर्चा करणार आहेत.
८ मार्च रोजी मुंबई उत्तर पश्चिम आणि ९ मार्च रोजी मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघानिहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. शिंदे संवाद साधणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यावर शिवसंवाद दौऱ्यात भर देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदार डॉ. शिंदे यांनी राज्यात जन संवाद यात्रा केली होती. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. याचा फायदा पक्षाला निवडणुकीत झाला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार ड़ॉ. शिंदे यांचा शिवसंवाद दौरा पक्ष विस्तार आणि बळकटीसाठी फायदेशीर ठरणार आहे.