नाशिक : सरकारने महाराष्ट्रामध्ये शक्ती फौजदारी कायदा तत्काळ लागू करावा या मागणीसाठी म्हणून अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र मध्ये गुन्हेगारीला कुठलाही धाक उरलेला नाही अशा परिस्थितीत महिला सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका महिलेवर अत्याचार करण्यात आला. तसेच काही महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना उच्चांकावर आहेत. त्यावर जाऊन देशाच्या केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुली बाबत छेडछाडीची घटना घडली. तसेच त्यांच्या सुरक्षारक्षकाबरोबर हातापायी करण्यात आली. केंद्रीय मंत्री यांनी केलेल्या आरोपानुसार सदरचे आरोपी ही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शक्ती फौजदारी कायदा अधिनियम २०२० ची तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नाशिक शहरातही अनेक शिक्षण संस्था असल्याने देशभरातून विद्यार्थी विद्यार्थिनी शिकायला येतात सत्ताधारी लोकप्रतिनिधी सुद्धा याबाबत तक्रार करत आहेत. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये कॅफेच्या नावाखाली चुकीचे उद्योग धंदे विविध भागात चालू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थांचा मोठा उद्योग शहरांमध्ये केला जातो. त्यामुळे तरुण पिढीला अत्यंत घातक असे प्रकार या शहरात घडत आहेत. याबाबतही त्वरित पावलं उचलावी अथवा काँग्रेस पक्ष अजून आक्रमक आंदोलन करेल असेही या निवेदनामध्ये नमूद केले आहे. जिल्ह्याचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त त्यांनी या प्रसंगी कायदा सुव्यवस्था लवकरात लवकर सुधारली नाही तर काँग्रेस पक्ष आक्रमकपणे आंदोलन करेल तसेच महानगरपालिकेच्या प्रश्नांच्या मागणी करता उद्या काँग्रेस पक्ष राजीव गांधी भवन येथे जन आंदोलन करणार असल्याची माहिती आकाश छाजेड यांनी दिली.