मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव २०२५’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, झी गौरव पुरस्काराच्या २५ वर्षांचा समृद्ध इतिहासासह, यावेळी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. यंदाचा ‘झी चित्र गौरव २०२५’ ‘जीवन गौरव’ पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री ‘निवेदिता जोशी सराफ’ यांना जाहीर करण्यात आला. ऐंशीच्या दशकात मराठी नायिकांची असलेली सोशिक, बिचारी आणि भाबडी प्रतिमा खोडून काढत, आपल्या बिनधास्त अभिनयाने चित्रपटसृष्टीत धूमधडाका करणारी आणि गेली चार दशके मराठी मनांवर आपल्या ग्लॅमरस अंदाजाने भूरळ पाडणारी, सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणजे निवेदिता जोशी सराफ. आई विमल जोशी आणि वडिल गजानन जोशी ह्या महान नाट्यकर्मींच्या रूपाने निवेदिता सराफ याना अभिनयाचं बाळकडू मिळालं आणि वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा नभोनाट्यात काम केलं. पुढे दहा वर्षांच्या असताना वडिलांच्या साथीने ‘ बंध रेशमाचे ‘ ह्या नाटकांतून निवेदिता सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि रंगभूमीशी जोडलं गेलेलं हे रेशमी बंधन अधिकच दृढ होत गेलं. ‘टिळक आगरकर’, ‘अखेरचा सवाल’, ‘ही श्रींची इच्छा’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘तुझ्या माझ्यात’, ‘श्रीमंत’, ‘हसत खेळत’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘संगीत संशयकल्लोळ’ अशा अनेक मराठीबरोबरच, गुजराती नाटकांमधूनही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘ अपनापन ‘ ह्या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून निवेदिता सराफ यांनी चित्रपटसृष्टीत ठेवलेलं चिमुरडं पाऊल, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ह्या चित्रपटातून नायिका म्हणून नावारूपाला आलं.
एकाहून एक नाविन्यपूर्ण भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांना आपली दखल घ्यायला भाग पडलं आणि मग चित्रपटसृष्टीलाही कळून चुकलं की ह्या पोरीचा मामला काही वेगळाच आहे. निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयसौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात केवळ घरच केलं नाही तर चिरेबंदी वाडाच बांधला. कधी आई, कधी मुलगी, कधी सून, कधी सासू बनून त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेवर महाराष्ट्राने कायमच भरभरून प्रेम केलं. रुपेरी पडद्यवार नायिका म्हणून स्वतःला सिद्ध करत असतानाच खऱ्या आयुष्यात देखील त्या कोणतंही कर्तव्य पार पाडायला कधीच कमी पडला नाहीत. आजही मालिका, वेब सीरिज, चित्रपट, नाटक ह्या सर्वच माध्यमातून कधी नायिका म्हणून तर कधी निर्माती म्हणून अत्यंत कल्पकपणे आणि सातत्याने निवेदिता सराफ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहात. त्यांचा हा सन्मान म्हणजे अतुलनीय योगदानाला वाहिलेली केवळ एक दुर्वांची जुडी.
तर ‘आदित्य सरपोतदार’ याना ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शास्त्रीय संगीतात किंवा शास्त्रीय नृत्यात काही महत्त्वाची घराणी असतात आणि ही घराणी आपल्या कलेतील योगदानामुळे त्या त्या क्षेत्रावर अधिराज्य गाजवतात. अगदी त्याचप्राणे मराठी चित्रपटसृष्टीच्या उगमापासूनच एक घराणं कलेचा हा प्रवाह अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी सतत कार्यरत होत. दादासाहेब फाळके आणि बाबुराव पेंढारकर यांच्या सोबत चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे नानासाहेब, अवघाचि संसार, रंगपंचमी यांसारख्या अत्यंत लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती करणारे विश्वासराव, उत्पादन व्यवस्थापनासोबतच पाचशेहून अधिक चित्रपटांच्या प्रसिद्धीची धुरा सांभाळणारे अजय आणि आता हिंदी चित्रपटांवर देखील मनोरंजनाच्या मुंज्याचं वलय प्रस्थापित करणारे आदित्य. ह्या चारही पिढयांची भारतीय चित्रपटसृष्टीच्या रजतपटाशी असलेली वीण अतूट ठेवणारा एक समान धागा म्हणजे ‘ सरपोतदार’ आणि आता ह्या महान परंपरेच्या चौथ्या पिढीचे पाईक बनून आदित्य सरपोतदार हा वारसा पुढे नेत यशाची नवी शिखरे गाठत आहेत. प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं, चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर नवनव्या विश्वांची निर्मिती करणं आणि त्यांनी हे स्वप्न आपल्या हटके आणि प्रयोगशील शैलीत अत्यंत कौशल्याने साकारलं. वयाच्या अवघ्या चौदाव्याच वर्षी वडिलांच्या आणि अभिनय देव यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच त्यांनी कॅमेरा हातात धरला आणि आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सहाय्यक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.
वयाच्या तेविसाव्या वर्षी दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पणातच चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेची मोठ्ठी ‘उलाढाल’ केली. तिथून ‘सतरंगी रे’ प्रवास सुरू झाला, ह्या ‘नारबाच्या वाडीतले’ दिलीप प्रभावळकरांसारखे अनेक दिग्गज कलाकार त्यांचा कामावर विश्वास ठेऊन त्यांच्याशी जोडले गेले, अंकुश चौधरी सारख्या सुपरस्टारने देखील ह्या मनोरंजनाच्या क्षेत्रात क्लासमेट बनून त्यांची साथ दिली. माऊली, फास्टर फेणे, झोम्बीवली यांसारख्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पनांनी मराठी रसिक प्रेक्षकांना त्यांनी सगळ्यांना थक्क करून सोडल. मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांनी यशस्वी घोडदौड केली. २०२४ साली प्रदर्शित झालेल्या मुंज्या चित्रपटाने तर शंभर कोटींची कमाई करत बॉक्सऑफिसवर नवा इतिहास रचला. मराठी चित्रपटाला चौकटीबाहेर नेण्यासाठी झटणाऱ्या ह्या समस्त सरपोतदार घराण्याच्या सन्मानार्थ यंदाचा झी चित्र गौरव मराठी पाऊल पडते पुढे २०२५ हा पुरस्कार.