मुंबई : आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून राज्यातील मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच अनेक महत्वाच्या वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी कार्य करत आहेत. विद्यापीठांमधील पदवीदान समारोहात अधिकांश सुवर्ण पदके मुलींना प्राप्त होत आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतीय महिलांचे भवितव्य अतिशय उज्वल आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोह तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ८) राजभवन मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक व महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याप्रमाणेच मदुराई येथील राणी मंगम्मल या जनसामान्यांचे हित जपणाऱ्या उत्कृष्ट शासक होत्या असे सांगून इतिहासात महिलांनी ज्या ज्या वेळी राज्य केले तेथे त्यांनी लोकहित व कल्याण जपले आहे, असे राज्यपालांनी सांगितले. भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तीचा नेहमीच सन्मान करण्यात आला आहे असे सांगून राजमाता जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते, असे उद्गार त्यांनी काढले.
देशाला सशक्त बनवायचे असेल तर महिलांचे योगदान आवश्यक आहे. देशाच्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या महिलांची असल्यामुळे त्यांच्या योगदानाशिवाय विकसित भारताचे लक्ष गाठता येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले. ग्रामीण भागात महिला बचत गटांमुळे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. पुरुष क्रिकेटपटूंना विमान सुविधा मिळत असताना पूर्वी महिला क्रिकेटपटूंना रेल्वेने प्रवास करावा लागे, असे सांगताना पुढील काळात अश्या प्रकारचा दुजाभाव पुढे राहणार नाही, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. २०२९ साली संसदेत तसेच विधानमंडळात अधिक महिला प्रतिनिधी राहतील याचा अभिमान महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणत नाही व त्यांचा मानव संसाधन म्हणून विकास करत नाही तोवर विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असे सांगून सन २०२९ साली संसदेत तसेच राज्यांच्या विधानमंडळात ३३ टक्के महिला प्रतिनिधी असणार याचा आपणास अभिमान वाटत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी काढले.
नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी प्रमाणे राज्यात इतरत्र देखील महिलांसाठी पतसंथा सुरु करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्त्रियांप्रती हिंसा चिंतेची बाब असून स्त्रियांच्या बाबतीत केवळ कायदे पुरेसे नाही तर त्यांच्या प्रति मुलांमध्ये सन्मानाची भावना जागवावी लागेल असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुलींचे शिक्षण तसेच त्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे असे सांगितले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबविण्यात राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा प्रतिभावंत महिलांचा सन्मान करण्यात आला.
अपंगत्वावर मात करणारी युवा लेखिका केया हटकर, भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, नागपूर येथील फायटर पायलट अंतरा मेहता, पुणे मेट्रोच्या पहिल्या महिला लोको पायलट अपूर्वा अलटकर, डिझेल इंजिन रेल्वे चालवणाऱ्या पहिल्या महिला लोको पायलट मुमताज काझी व पत्रकार रूपाली बडवे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अहिल्यानगर येथील समाज माध्यमातील नामांकित शेफ सुमन धामणे, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी, नागपूर महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी तसेच राज्याच्या पहिला मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण रूपे कार्डचे अनावरण करण्यात आले तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी उपस्थितांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही शपथ दिली. त्यानंतर राज्यपालांच्या हस्ते ‘बाळाचे सुवर्णमयी १००० दिवस’ या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.