सोलापूर : प्रतिबंधित असलेला ओला मावा, सुगंधित तंबाखू व पान मसाला खुलेआम विकणार्या पाच दुकानांत धाड टाकून किरकोळ मुद्देमाल जप्त करून अन्न व औषध प्रशासन वाहवा मिळवत आहे. हा केवळ कारवाईचा फार्स असल्याची टीका महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे. या छोट्या पानटपरीधारकांना माल पुरणार्या डिलर्सवर अगोदर कारवाई करा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाला केले आहे.
प्रतिबंधित असलेला ओलामावा, सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री केला जात आहे. परंतु याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या पानटपरीधारकांना ओला मावा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला हा माल कुठून येतो ? याचा सखोल तपास करून हा माल पुरवणारे जिल्हा व तालुका पातळीवरच्या डिलर्स लोकांना आधी पकडायला पाहिजे. हे मोठे मासे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गळाला का लागत नाहीत ? असा सवाल गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे. यामागे खरे आरोपी हे छोटे-छोटे पानटपरीधारक नसून यांना माल पुरवणारे लोक हे खरे आरोपी आहेत. लाखो रूपयांची उलाढाल यामधून होत आहे.