स्विस एअर क्वॉलिटी टेक्नॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये दावा
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक वायू प्रदूषित २० शहरांच्या यादीत भारताच्या १३ शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आसामचे बर्निहाट हे देशातील सर्वाधिक वायू प्रदूषित शहर ठरले आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधून समोर आली आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२४ अनुसार दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात वायू प्रदूषित राजधानी ठरली आहे. तसेच जगातील चौथ्या क्रमाकांचे वायू प्रदूषित शहरही ठरले आहे. भारत २०२४ मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात वायू प्रदूषित देश ठरला होता. तर २०२३ मध्ये तिसऱ्या स्थानावर होता. अहवालानुसार,जगातील सर्वात प्रदूषित १० शहरांपैकी ६ शहरे भारतातील आहेत. दिल्लीमध्ये प्रदूषणाची उच्च पातळी नोंदवली जात आहे, वार्षिक सरासरी पीएम २.५ एकाग्रता प्रति घनमीटर ९१.६ मायक्रोग्राम आहे. जी २०२३ मध्ये प्रति घनमीटर ९२.७ मायक्रोग्राम होती, जी जवळजवळ बदललेली नाही. जगातील सर्वाधिक वायू प्रदूषित २० शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत.
त्यामध्ये बर्निहाट, दिल्ली, मुल्लानपूर (पंजाब), फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुडगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे. एकूणच, ३५ टक्के भारतीय शहरांमध्ये वार्षिक पीएम २.५ पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या ५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर मर्यादेपेक्षा १० पट जास्त आहे. भारतात वायू प्रदूषण हा एक गंभीर आरोग्य धोका आहे, ज्यामुळे आयुर्मान अंदाजे ५.२ वर्षांनी कमी होते. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ अभ्यासानुसार, २००९ ते २०१९ पर्यंत, भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे सुमारे १५ लाख मृत्यू झाले आहेत.