पुणे : महागडी मोटार येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध थांबवून लघुशंका आणि अश्लील चाळे केलेल्या गौरव आहुजाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने मोटारीची ‘नंबरप्लेट’ काढून तिची विल्हेवाट लावली. त्याच्या मोटारीत मद्याची बाटली आणि ग्लास आढळले. पोलिसांनी मोटार व त्यातील वस्तू जप्त केल्या. पुण्यातून पसार झाल्यानंतर गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) कोल्हापूरला गेला. कोल्हापूरच्या अलीकडे त्याने मोटार लावली. अज्ञात इसम तसेच आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘नंबरप्लेट’ची विल्हेवाट लावल्याचे उघड झाले. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय ठकार तपास करीत आहेत.
गौरवच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केटयार्ड) यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील योगेश कदम यांनी युक्तिवाद केला. ‘गुन्हा करण्यापूर्वी आरोपी कुठे गेले, त्यांनी कोणत्या ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन केले, त्यांनी कुठे मद्यप्राशन केले याची माहिती आरोपींकडून घ्यावयाची आहे. गुन्हा केल्यानंतर गौरव मोटारीतून कसा, कोणत्या मार्गे आणि कुणासोबत परत आला याचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात व गुन्हा केल्यावर पळून जाण्यात त्याला कुणी मदत केली याची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद त्यांनी केला.