मुंबई : ऑगस्ट २०२४ मध्ये नेपाळ मधील काठमांडू येथील देवदर्शनासाठी जाताना बस दरीत कोसळून जळगांव जिल्ह्यातील २५ भाविकांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून सव्वा कोटी रुपयांची मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या नेपाळमधील या दुर्घटनेतील मृंतांमध्ये जळगांव जिल्ह्यातील वरखेडे, तळेगांव, मुशी आणि अन्य परिसरातील २५ जणांचा समावेश होता. याची दखल घेत, तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यु झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांसोबत राज्य शासन उभे असून मदत म्हणून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार मृतांच्या कुटुंबांतील वारसाला ५ लाख रुपये, अशा रितीने २५ कुटुंबियांना १ कोटी २५ लाख रुपयांची मदत वितरीत करण्याची कार्यवाही पूर्ण केली गेली असल्याचे नाईक यांनी सांगितले. ही मदत केवळ आर्थिक आधार नसून, कठीण काळात सरकार नागरिकांच्या पाठीशी उभे असल्याचे प्रमाण आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून या कुटुंबांना काही अंशी दिलासा मिळावा यासाठीचा हा प्रयत्न आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.