नवी दिल्ली : भारतीय हवाई दल आपली ताकद वाढवण्यासाठी ११४ नवीन मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहे. हवाई दलाला पुढील ४ ते ५ वर्षांत जागतिक निविदा काढून ही विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करायची आहेत. या स्पर्धेत बोईंग, लॉकहीड मार्टिन, डसॉल्ट आणि साबसह अनेक मोठ्या कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे.
जागतिक निविदेचा भाग असलेल्या विमानांमध्ये राफेल, ग्रिपेन, युरोफायटर टायफून, मिग-३१ आणि यूएस एफ-१६, एफ-१५ जेट्सचा समावेश आहे. यापैकी, एफ-१५ वगळता इतर लढाऊ विमानांनी १२६ मल्टी टास्क लढाऊ विमानांसाठी मागील निविदेत आधीच भाग घेतला आहे आणि त्यांचे मूल्यांकन देखील केले गेले आहे. यावेळी शर्यतीत उतरणारे एकमेव नवीन विमान म्हणजे अमेरिकन कंपनी बोईंगचे एफ-१५ स्ट्राइक ईगल हे लढाऊ विमान आहे. संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले की, 114 बहु-उद्देशिय लढाऊ विमानांच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाला पुढील १० वर्षांत त्यांची स्क्वाड्रन ताकद टिकवून ठेवण्यास मदत होईल. यासोबतच, मार्क-१ ए आणि मार्क-२ सारखी हलकी लढाऊ विमाने देखील हवाई दलात समाविष्ट केली जातील.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आपला अहवाल सादर केला आणि हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी ११४ मल्टी टास्क लढाऊ विमाने खरेदी करण्याची गरज अधोरेखित केली. यासोबतच संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले की, हवाई दल २०३७ पर्यंत १० स्क्वॉड्रन लढाऊ विमाने निवृत्त करेल. हवाई दलाला २०४७ पर्यंत ६० लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनची क्षमता गाठायची आहे. पुढील ५ ते १० वर्षांत या लढाऊ विमानांचा ताफ्यात समावेश झाल्याने २ आघाड्यांवर युद्ध करण्याची क्षमता आणखी वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे.
त्याचप्रमाणे पुढील १० ते १२ वर्षांत हवाई दलाच्या ताफ्यातून जॅग्वार, मिराज-२००० आणि मिग-२९ ही विमाने टप्प्याटप्प्याने वगळण्यात येतील. जुन्या मिग मालिकेतील विमाने टप्प्याटप्प्याने बंद केल्याने आणि एलसीए मार्क-१ आणि मार्क-१ ए सारख्या नवीन स्वदेशी विमानांच्या समावेशात विलंब झाल्यामुळे हवाई दलात लढाऊ विमानांच्या संख्येत घट होत आहे. हवाई दलाला त्यांच्या ताफ्यात फक्त 36 राफेल विमाने जोडता आली आहेत, जी ४.५ पेक्षा जास्त पिढीच्या श्रेणीतील लढाऊ विमाने आहेत.