एआय तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार – शरद पवार

0

पुणे : एआय तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार, असा विश्वास माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. शरद पवार बोलताना म्हणाले की, ऊसाचे दर एकरी उत्पादन पाहता ऊसातील साखरेचे प्रमाण वाढेल. ऊसाचा धंदा अधिक सोयीचा व परवडणारा होईल. एआयमुळे हा चमत्कार होऊ शकतो. हे तंत्रज्ञान आणण्याचा बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न सुरू होता. मला आनंद आहे. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या सूचनेनुसार आज बैठक होणार आहे. त्यात जवळपास 300 प्रतिनिधी सहभागी होतील. त्यांच्यासमोर ये तंत्रज्ञान दाखवले जाईल. हा क्रांतीकारक निर्णय महाराष्ट्रातून सुरू होईल, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे, बीड, अमरावती बाबतची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्ही थोडी फार माहिती काढली. ठिकठिकाणची माहिती एकत्र करत आहोत. केंद्र सरकारने त्याबाबत धोरण आखावे. त्यांनी मदत करण्यासाठी नीती ठरवावी हा आग्रह धरणार आहोत. या कामात लक्ष घातले जाईल. सरकार याविषयी कठोर पाऊल उचलेल असा विश्वास आहे. असेही पवार यांनी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो. पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती. शांत व समन्वयाने सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीडला ओळखतो. बीड जिल्ह्याचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी स्वत: जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो, तेव्हा तिथे सहा-सहा सदस्य निवडून आले होते, तिथे एक प्रकारे सामंजस्याचं वातावरण होतं. पण दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. त्याचे दुष्परिणाम आपल्या गत काही महिन्यांत दिसून येत आहेत.

माझे स्पष्ट मत आहे की, राज्य सरकारने यात कुणाचा हात आहे याचा विचार न करता जो कुणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करेल, त्यांच्याविरोधात अत्यंत सक्त धोरण आखण्याची गरज आहे. त्यातून बीडला पूर्वीचे वैभवाचे दिवस कसे येतील याची काळजी घ्यावी. असे शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले की, राज्यात सर्वत्र वातावरण बिघडल्याचे मी म्हणणार नाही. पण काही ठिकाणी निश्चितच परिस्थितीत बिघडली आहे. काही घटक त्याचा गैरफायदा घेत आहेत. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. कठोर कारवाई करावी. कुणी सत्तेचा गैरवापर व लोकांमध्ये जात व धर्म यांच्यातील काही अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर सरकारने त्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, असेही शरद पवार यांनी बोलताना सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech