बंगळुरू : केंद्र सरकारने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-५ मोहिमेला मान्यता दिली आहे.इस्रो प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्ही. नारायणन यांनी यासंदर्भात माहिती दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की, फक्त तीन दिवसांपूर्वीच आम्हाला चांद्रयान-५ मोहिमेला मंजुरी मिळाली. यामध्ये जपान आमचा मित्र असेल. चांद्रयान-३ मोहिमेत २५ किलो वजनाचा रोव्हर (प्रज्ञान) होता, तर चांद्रयान-५ मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी २५० किलो वजनाचा रोव्हर असेल.भविष्यातील प्रकल्पाबाबत नारायणन म्हणाले की, २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावरील मातीचे नमुने आणणे आहे. गगनयानसह अनेक मोहिमांव्यतिरिक्त, अंतराळात भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या योजना सुरू आहेत.
नारायणन म्हणाले की, चांद्रयान मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे आहे. २००८ मध्ये चांद्रयान-१ यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले, ज्याने चंद्राचे रासायनिक, खनिज आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंग केले. तर २०१८ सालचे चांद्रयान-२ ९८ टक्क्यांपर्यंत यशस्वी झाले होते, मात्र शेवटच्या टप्प्यात केवळ २ टक्के मिशन साध्य होऊ शकले नाही, असे असतानाही चांद्रयान-२ वर बसवण्यात आलेला हाय रिझोल्युशन कॅमेराही शेकडो छायाचित्रे पाठवत आहे.
व्ही नारायणन म्हणाले की, चांद्रयान-३ मिशन हे चांद्रयान-२ चे फॉलो-ऑन मिशन आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि रोमिंगची पूर्ण क्षमता प्रदर्शित करणे हा त्याचा उद्देश आहे.चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि रोव्हरची क्षमता प्रदर्शित करणे हे चांद्रयान-३ मोहिमेचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-३ लँडर विक्रमने २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान-४ मिशन २०२७ मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. चंद्रावरून गोळा केलेले नमुने आणणे हा त्याचा उद्देश आहे.