सोलापूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या चिपळ्या आणि पादुका भाविकांच्या दर्शनासाठी खुल्या केल्या आहेत. पंढरपूर येथील भाविकांना पादुका, चिपळ्या यांचे दर्शन घेता येणार आहे. शके १६०५ मधील तुकाराम महाराजांच्या अभंगाची दुर्मीळ हस्तलिखित प्रत देखील भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला ३७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त त्यांचे अकरावे वंशज बाळासाहेब देहूकर यांनी महाराजांच्या चिपळ्या पादुका आणि अभंगाची दुर्मीळ हस्तलिखित वही भाविकांच्या दर्शनासाठी आज खुली केली आहे.जगद्गुरुंच्या वैकुंठ गमनाचे हे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. महाराजांचे पणतू महादेव महाराज आणि त्यांचे पुत्र वासुदेव महाराज हे देवाच्या सेवेसाठी पंढरपूर येथे कायम वास्तव्याला आले होते. नंतरच्या काळात याच ठिकाणी जगद्गुरूंची मोठ्या मुलाची पिढी पंढरपूरमध्ये सेवा करत राहिली. यातील वासुदेव महाराज यांनी फड परंपरेला पंढरपुरात सुरुवात केली. त्यामुळे त्यांना याचे जनक मानले जाते.