मुंबई : प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचे बंधू भूषण पोपटराव मंजुळे आता “सुधा – विजय १९४२” ह्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे. वरुणराज मोरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य सिनेमा अनुभव ठरणार आहे. सैराट, घर बंदूक बिर्याणी, झुंड, फँड्री यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय व कास्टिंगसाठी ओळखले जाणारे भूषण मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते म्हणून पुढे आले आहेत.या चित्रपटाची निर्मिती श्री. शिव लोखंडे आणि सौ. सरिता मंजुळे यांनी केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कथा निवडी आणि दर्जेदार सिनेमा निर्मितीमुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे , तसेच हा चित्रपट रुमीर प्रॉडक्शन आणि व्ही स्क्वेअर एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने तयार होत आहे.
मंजुळे बंधू त्यांच्या परिपूर्ण कास्टिंगसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण असतील यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे. भूषण यांनी यापूर्वीही नव्या कलाकारांना मोठ्या संधी दिल्या आहेत. “सुधा – विजय १९४२” हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची आणि त्याच्या अढळ प्रेमकथेची हृदयस्पर्शी कहाणी सांगतो.या पोस्टरमध्ये त्या काळाची झलक आणि चित्रपटातील भावनिक गुंतवणूक दिसून येते. आता लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.