नागपूर हिंसाचार पूर्वनियोजितच, मात्र पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत…?

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

अनंत नलावडे
मुंबई : नागपूर शहरात सोमवारी रात्री उसळलेली जातीय दंगल सदृश्य घटना हा पूर्वनियोजित हल्लाच होता हे स्पष्ट झाले असून पोलिसांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सविस्तर माहिती देताना दिला. या हिंसाचारात तीन उपायुक्तांसह एकूण ३३ पोलीस जखमी झाले असून, एका उपायुक्तावर तर कुऱ्हाडीने हल्ला झाला आहे.याशिवाय पाच नागरिक जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.पोलिसांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा असून, ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी महाल भागात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेब कबर हटाओ’ आंदोलन केलं.आंदोलना दरम्यान गवताची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती.यानंतर अफवा पसरवण्यात आली की, त्या कबरवर धार्मिक मजकूर होता.यानंतर नमाज संपल्यानंतर मोठा जमाव जमला आणि हंसापुरी भागात २०० ते ३०० लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली.यामध्ये १२ दुचाकींचे नुकसान झाले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुसऱ्या घटनेत एक क्रेन आणि जेसीबी जाळण्यात आले.यावेळी दगडफेकी साठी ट्रॉलीभर दगड आधीच साठवून ठेवले होते, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.काही ठिकाणी निवडकपणे घरे व दुकाने लक्ष्य करण्यात आल्याने यामागे निश्चितच सुनियोजित कट असल्याचेही त्यांनी तितक्याच ठामपणाने स्पष्ट केले.

या घटनेनंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी ५ गुन्हे दाखल केले असून, ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एसआरपीएफ च्या ५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यस्था राखण्याचे आदेश दिल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे.म्हणून इथे शांतता राहिली तरच आपण प्रगतीकडे जाऊ.त्यामुळे यापुढे कोणीही दंगा केला, तर जात-धर्म न पाहता कठोर कारवाई केली जाईल.”असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्र्यांनी ‘छावा’ चित्रपटामुळे लोकांच्या भावना उचंबळल्या असल्याचे सांगत संयम राखण्याचे आवाहन केले. “औरंगजेबाविषयीचा राग बाहेर येतो आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये. राज्याची शांतता अबाधित राखणे हीच खरी प्रगती आहे.”अशा शब्दात त्यांनी सर्वांना राज्यात शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले.तर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करत “औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानच असून अशी विघातक मत हा सरळसरळ हे देशद्रोहच आहे.” असे ठाम मत मांडले.

ते पुढे म्हणाले, “ज्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले, त्याच्या मुळाशी सरकार जाईल.नागपूरमध्ये पोलिसांनी मध्यस्थी करून शांतता राखली, तरी काही तासांत दोन ते पाच हजारांचा जमाव कसा जमला? मोठे दगड कुठून आले? पेट्रोल बॉम्ब कुणाकडे होते? हे सर्व नियोजनबद्ध षडयंत्र असून एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले.”याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही टीका केली, “मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करणे अत्यंत निंदनीय आहे.सपकाळ यांनी माफी मागावी.”अशी मागणीही त्यांनी केली.दरम्यान, जालना शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान झाल्याचा मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला.यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले.

नागपूरमधील हिंसाचार हा केवळ अचानक उसळलेला नाही तर संपूर्ण पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलिसांवरील हल्ले सहन केला जाणार नाहीत, राज्यातील शांतता बिघडवणाऱ्यांवर जात-धर्म न पाहता कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा सरकारने दिला आहे. महाराष्ट्राची शांतता आणि प्रगती अबाधित ठेवण्यासाठी सरकार कणखरपणे उभे राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech