विकासापासून पळणारे घोषणाबाज सरकार……..!

0

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर तीव्र हल्लाबोल

अनंत नलावडे

मुंबई : राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याची गरज असताना हे सरकार केवळ घोषणा आणि जाहिरातींच्या माध्यमातून विकासाचा डांगोरा पिटत आहे. मात्र प्रत्यक्षात सामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचत नाही, अशा शब्दांत मंगळवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. “सरकारचा विकास हा फक्त होर्डिंग्ज, जाहिरातबाजी आणि भाषणांमध्येच दिसतो.ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे.हे सरकार केवळ घोषणाबाज असून विकासापासून दूर पळणारं आहे,”असाही आरोप दानवे यांनी केला.

मुंबई,पुणे,संभाजीनगर महानगर पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीडीआर घोटाळे झाले असून, राज्य विकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली जमिनी अदानीच्या घशात घालण्याचं काम सरकार करत आहे,”असाही थेट आरोप दानवे यांनी २६० अन्वये प्रस्तावावर बोलताना सरकारवर केला.

नगरविकास विभागातील म्हाडा आणि सिडको यांच्यावरही दानवे यांनी टीका केली.”सिडकोने गरिबांसाठी घरांची योजना आणली पण ती देखील सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे.सिडकोचे प्रकल्प फक्त कंत्राटदारांना फायदा व्हावा यासाठी आखले जात आहेत,” असा आरोप करत,खारघर येथील स्वप्नपूर्ती निवासी संकुलात मेंटेनन्स थांबवण्याच्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयावरही दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.”सिडकोचे अधिकारी उपमुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाहीत.त्यांची मुजोरी वाढलेली आहे, याकडे त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले.

निधी वाटपातही सरकारकडून पक्षीय भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत दानवे म्हणाले, “मंत्री नितेश राणे यांनी आमच्या पक्षात आलात तरच निधी मिळेल असं खुलेआम म्हटलं.” रखडलेले स्मार्ट सिटी प्रकल्प, अपूर्ण घरकुल योजना, रखडलेल्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आयुक्तांचा मनमानी कारभार, मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी, पाणंद रस्त्यांचा प्रश्न अशा मुद्द्यांवरून दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर सरकारने धोरण जाहीर केलं. मात्र त्याची अंमलबजावणी शून्य आहे, हेही त्यांनी सभागृहात अधोरेखित केलं. “हे सरकार फक्त बोलघेवडे आहे, प्रत्यक्षात जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी काहीच करत नाही,” अशी घणाघाती टीकाही दानवे यांनी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech