विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल
अनंत नलावडे
मुंबई : राज्याचा मुख्यमंत्री नागपूरचा, गृहखाते सुद्धा त्यांच्याकडे, तरीही नागपूर मध्ये जातीय दंगल होते.मग गुप्तचर यंत्रणा काय झोपल्या होत्या का? असा संतप्त व परखड सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी नागपूर दंगलप्रश्नावर बोलताना सरकारला विचारला. मी विरोधक म्हणून नाही, तर या राज्याचा सामान्य नागरिक म्हणून बोलत असल्याचे स्पष्टीकरणही यांनी केले. नागपूरच्या घटनेवरुन दिसून येते की, राज्यात प्रशासनावर आणि गृहखात्यावर सरकारचा वचक राहिलेला नाही.कारण ज्या पद्धतीने वातावरण बिघडवले जात आहे, ते अतिशय गंभीर आहे.समाजात फूट पाडण्याचं काम सुरू आहे आणि सरकारच यामागे असल्याचा स्पष्ट संदेश यातून मिळतो,” असा थेट आरोपच त्यांनी केला.
“अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. यावरून सरकारचा उद्देश स्पष्ट होतो.समाजात तणाव निर्माण करणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे,” असे सांगत दानवे यांनी थेट भाजपवर टीकेचा निशाणा साधला “भाजपच्या बगल बच्च्यांनी वातावरण चिघळवण्याचं काम केलं आहे.भाजप, बजरंग दल, विहिंप, संघटनेतील लोकांच्या वक्तव्यावरूनही हेच दिसून येत आहे की, समाजात फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे.नितेश राणे एकटेच नाहीत, हे सगळेच यात सामील आहेत,” असाही गंभीर आरोप दानवे यांनी केला.त्याचवेळी हे थांबवायचं असेल तर सरकारने तातडीने कठोर भूमिका घ्यावी,” अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.