संघाची प्रतिनिधीसभा शुक्रवारपासून कर्नाटकात
बंगळुरू : औरंगजेब आजच्या काळात प्रासंगिक नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. याप्रकरणी पोलिस योग्य ती दखल घेऊन सखोल चौकशी करतील असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. कर्नाटकच्या बंगळुरू येथे आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रात औरंगजेबची कबर हटवण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावरून १७ मार्च रोजी नागपुरात हिंसाचार घडला होता. यापार्श्वभूमीवर सुनील आंबेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानुषंगाने हिंसाचाराचा निषेध करत आंबेकर यांनी वर्तमानात औरंगजेब प्रासंगिक नसल्याचे सांगितले. संघाच्या प्रतिनिधी सभेबाबत माहिती देताना आंबेकर म्हणाले की, कर्नाटकच्या बंगळुरू येथे २१ ते २३ मार्च दरम्यान संघाच्या प्रतिनिधीसभेची बैठक होणार आहे. यात बांगलादेश आणि संघ शताब्दी समारंभांबाबत ठराव मंजूर केला जाईल. तसेच संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे या बैठकीत संघाने केलेल्या आणि भविष्यातील प्रस्तावित कामांचा सविस्तर सारांश सादर करतील. प्रादेशिक प्रमुख त्यांचे कार्य, कार्यक्रम, भूमिका आणि भविष्यातील योजना देखील सादर करतील, ज्यांचा आढावा घेतला जाईल.
वर्तमानातील ‘बांगलादेशची परिस्थिती आणि संघाची भूमिका यावर कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि चर्चेनंतर मंजूर झालेला ठराव कोअर कमिटीसमोर सादर केला जाईल. संघाच्या शताब्दी समारंभाबद्दल आंबेकर म्हणाले की, यावर्षी विजयादशमीला संघ १०० वर्षे पूर्ण करेल. संघाने २०२५ च्या विजयादशमीपासून २०२६ पर्यंत शताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. शताब्दी वर्षाच्या समारंभाबद्दल एक ठराव मंजूर केला जाईल, जो सार्वजनिक केला जाईल असे आंबेकर यांनी सांगितले. संघाच्या प्रतिनिधीसभेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह संघ परिवारातील ३२ संघटनांचे प्रतिनिधी, राष्ट्र सेविका समितीच्या प्रधान संचालिका शांताक्का, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा सहभागी होतील.